मुंबई शहरात मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे

मुंबई – मुंबई शहरात मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. असे असाताना आज एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शहरातील मालाडमध्ये रहिवासी चारमजली इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ८ लहान बालकांचा समावेश आहे. न्यू कलेक्टर कंपाऊंड मध्ये ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

दुर्घटनेतून रेस्क्यू करण्यात आलेल्या जखमींना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या इमारतीत एकूण दोन ते तीन कुटुंब याठिकाणी राहत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खबरदारी म्हणून इमारतही रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलवण्यात येत असून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली काहीजण दबले असल्याची भीती असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

You May Also Like