मुलगी पाहायला आले अन् लग्न लावून गेले!

धुळे शहरात आदर्श निर्माण करणारा सोहळा

धुळे : सध्या सर्वत्र लग्नाची धामधूम सुरू आहे. आजच्या काळात लग्नसमारंभ मोठ्या थाटात करण्याची पद्धत रूढ झाली आहे. समाजात तर लग्नसमारंभावर लाखो रुपये खर्च केले जातात. पण परिवारातील सदस्य तथा उच्चशिक्षित दाम्पत्याने बडेजावपणा व अनावश्यक खर्चाला फाटा देत चट मंगनी पट ब्याह’ करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केले आहे.

आंबोडे येथील कुलदीप गिरीशानंद सोनवणे (ह.मु.कन्नड, जि. औरंगाबाद) यांच्यासाठी मुलगी पाहायला मराठे परिवाराच्या निमंत्रणावरून कन्नड येथून रविवारी (ता.23) धुळे येथे आले होते. धुळे शहरतील साई विहार (समृध्दी नगर, नकाणे रोड) येथे दोघांनीही एकमेकांना पसंत केले. दोन्ही परिवाराचीही पसंती झाली आणि त्यातूनच अवाजवी खर्च आणि वेळ वाया घालविण्यापेक्षा लागलीच लग्न लावून देण्यास काय हरकत आहे? असा प्रस्ताव समोर आला. दोन्ही परिवारांनी त्याला होकार दिला आणि अवघ्या काही तासांतच कौटुंबिक वातावरणात मोजक्या समाजबांधवांच्या व आप्तेष्टांच्या उपस्थितीत धर्म पद्धतीने कुलदीप आणि पूजा विवाहबद्ध झाले. करोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व नियम पाळून मराठा समाजातील दोन्ही परिवारांनी वेळ, श्रम व पैशांची बचत करून समस्त समाजात एक नवीन आदर्श निर्माण केला असल्याचे यावेळी सांगितले व समाजाला आता अशा प्रकारच्या विवाहांची गरज असून, मराठे व सोनवणे परिवाराचे अभिनंदन व कौतुक केले.

या आदर्श विवाहासाठी पुढाकार
या आदर्श विवाहासाठी सुधीर चव्हाण, झुंजार मराठे, पंडित गुरुजी, बलानेकर गिरीशानंद सोनवणे, प्रमोद पाटील , नितीन पाटील , शिवाजीराव गावंडे श्रीकांत पाटील यांनी पुढाकार घेतला.

You May Also Like