यास चक्रीवादळ 26 मे पर्यंत धडकण्याची शक्यता! केंद्राचे राज्यांना सतर्कतेचे आदेश

नवी दिल्ली : भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर नुकतंच तौते चक्रीवादळ धडकल्यानंतर बसलेल्या धक्क्यातून बचावकार्य करणार्‍या यंत्रणा सावरल्या नाहीत, तोच आता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नवं चक्रीवादळ घोंघावू लागलं आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक वेगाने वाढला, तर येत्या 26 मे रोजी यास चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्या दृष्टीने आता केंद्र सरकारने देखील तयारी सुरू केली असून पूर्व किनारपट्टीवर ज्या ज्या राज्यांना यास चक्रीवादळाचा धोका आहे, त्या राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 26 मे रोजी यास चक्रीवादळ पश्चिम बंगाल किंवा ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्र सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून पश्चिम बंगाल आणि ओडिशासोबतच आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि अंदमान-निकोबारमधील प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. यास चक्रीवादळाच्या मार्गात येणार्‍या प्रदेशामध्ये असलेल्या रुग्णालयांमधील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यास चक्रीवादळ 26 मे रोजी पश्चिम बंगाल किंवा ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता गृहित धरून एनडीआरएफच्या टीम देखील सज्ज झाल्या आहेत. एनडीआरएफनं आपल्या काही टीम तौते चक्रीवादळामुळे बसलेल्या तडाख्यामध्ये बचावकार्य आणि पुनर्वसन कार्यासाठी पाठवल्या होत्या. त्या टीम माघारी बोलावण्यात येत आहेत. एनडीआरएफच्या तुकड्या त्या त्या ठिकाणी मदतकार्यासाठी पाठवल्या जातील.

You May Also Like