मोबाईल चोरटय़ाचा पाठलाग करताना तोल जाऊन महिला लोकलच्या ट्रकमध्ये पडल्याची घटना

मोबाईल चोरटय़ाचा पाठलाग करताना तोल जाऊन महिला लोकलच्या ट्रकमध्ये पडल्याची घटना बुधवारी सायंकाळी दादरच्या फलाट क्रमांक 4 वर घडली. स्नेहल हुलके असे त्या जखमी महिलेचे नाव आहे. मोबाईल चोरी प्रकरणी राहुल बुटियाला मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी अटक केली.

स्नेहल हुलके या विरार येथील रहिवासी असून त्या पश्चिम रेल्वेत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करतात.

बुधवारी दुपारी त्यांनी विरार येथून चर्चगेटला जाणारी लोकल पकडली. सायंकाळी पावणेचारच्या सुमारास लोकल दादर रेल्वे स्थानकात आली. लोकल चर्चगेटच्या दिशेने जाणार तोच राहुल त्या डब्यात शिरला. त्याने स्नेहल यांचा मोबाईल चोरून पळ काढला. मोबाईल चोराचा पाठलाग करताना स्नेहलदेखील धावत्या लोकलमधून खाली उतरल्या. राहुलचा पाठलाग करत असतानाच तोल जाऊन त्या ट्रकमध्ये पडल्या. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती समजताच पश्चिम रेल्वेचे पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक एम. इनामदार आणि डिटेक्शन स्टाफ हे घटनास्थळी आले. पोलिसांनी स्नेहलला उपचारासाठी जगजीवनराम रेल्वे रुग्णालयात दाखल केले.

स्नेहलच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक एम. इनामदार यांच्या पथकातील उप निरीक्षक सुहास कदम, शेख, खाडे, कांबळे, पाटील, मराळ यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांनी त्या ठिकाणची सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये राहुल दिसला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक दादर फुलमार्पेट परिसरात गेले. खबऱयाच्या मदतीने आज पहाटे राहुलला पोलिसांनी गजाआड केले. चौकशीत त्याने मोबाईल चोरीची पोलिसांना कबुली दिली. राहुल हा दादर परिसरात राहत असून त्याला दारूचे व्यसन आहे.

त्याने दारूच्या नशेत स्नेहल यांचा मोबाईल चोरला होता. पोलिसांनी तो चोरीचा मोबाईल जप्त केला आहे. राहुलला आज अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

You May Also Like

error: Content is protected !!