भारतीय संघ ऑस्ट्रेलियात घडविणार इतिहास

मुंबई : भारतीय संघ पुढील महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्धची पाच टेस्टची मालिका तसेच ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या टीमची परीक्षा असणार आहे. पुरुष टीमसोबतच महिला टीमसाठी देखील हे वर्ष ऐतिहासिक असणार आहे. महिला टीम यंदा तब्बल 7 वर्षांनंतर टेस्ट मॅच खेळणार आहे. त्याचबरोबर महिला टीमसाठी एक आनंदाची घटना ऑस्ट्रेलिया दौर्‍यात घडणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट टीम इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यात पहिल्यांदाच महिला टीम पिंक बॉल टेस्ट खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात होणारी ही टेस्ट मॅच डे-नाईट असेल. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी ही माहिती दिली आहे. महिला टीमनं यापूर्वी 2006 साली ऑस्ट्रेलियात टेस्ट मॅच खेळली होती.

भारत आणि ऑस्ट्रेलिया सीरिजचे वेळापत्रक अजून जाहीर झालेलं नाही. पण भारतीय महिला टीमनं एका कॅलेंडर वर्षात 2 टेस्ट खेळल्या आहेत, असं खूप कमी वेळा झाले आहे. टीम इंडिया पुढील महिन्यात 16 जून पासून ब्रिस्टलमध्ये इंग्लंड विरुद्ध टेस्ट मॅच खेळणार आहे. भारतीय पुरुष टीम देखील पुढील महिन्यात इंग्लंड दौर्‍यावर जाणार असून या दौर्‍यासाठी दोन्ही टीम एकाच विमानाने इंग्लंडला जाणार आहेत.

You May Also Like