महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनने आगमनाच्या पहिल्याच दिवशी मुंबापुरीला दिलेला तडाखा

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनने आगमनाच्या पहिल्याच दिवशी मुंबापुरीला दिलेला तडाखा अजूनही कायम आहे. दरम्यान, येत्या रविवारी मुंबई आणि ठाण्यात अतिवृष्टी होईल, असा इशाराच भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला. विशेषत: संपूर्ण कोकण किनारीपट्टीच्या भागात पुढील काही दिवस जलधारा रुद्रावतार धारण करणार असून, गरज असेल तरच मुंबई आणि ठाणेवासीयांनाे घराबाहेर पडा; अन्यथा आपला वीकेंड घरीच साजरा करा, असे आवाहनही हवामान खात्याने केले.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्याचा पश्चिमेकडील प्रवास गृहीत धरून पश्चिम किनारपट्टीच्या भागावर म्हणजे कोकण किनाऱ्यावर पुढील चार ते पाच अति तीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पश्चिम किनारी जोरदार वारे वाहतील. याचा परिणाम म्हणून मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि रायगडला पुढील ३ दिवस रेड अलर्ट आहे. मुंबई आणि ठाण्याला रविवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. पावसाचा वेग वाढताना दिसेल. मुंबईकर, ठाणेकर कृपया काळजी घ्या. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे ते म्हणाले.

You May Also Like