आईची आपल्या पिल्लाशी झालेली ताटातूट अखेर संपली

सांगली । निसर्ग खूप सुंदर आहे, आपण त्याला आपला मानून सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. या पंक्तीला साजेशा प्रकार सांगली येथे घडला. माकडीण आणि तिच्या पिल्लाची झालेली ताटातूट अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर संपुष्टात आली आहे. 4 ऑगस्ट रोजी शिराळा तालुक्यातील वाकुर्डे वाकेशवर मंदिरा जवळ एक वानराचे पिल्लू गावातील लोकांना खाली पडलेलं सापडले होते. त्यांनी वाकुर्डे येथील प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या वन्यजीव आपत्कालीन सेवा दलातील रेस्कुअर अविनाश पाटील यांच्याकडे ते आणून दिले.

 

रेस्क्यू टीमने त्याचे रिपोर्टिंग वनविभाग शिराळा, याठिकाणी करून त्यास गावातील वनकर्मचारी दादासो शेटके यांच्या मार्गदर्शनाखाली खाऊ पिऊ घालून सुरक्षित ठेवले. पिल्लास त्याच ठिकाणी परत आईकडे सोडणे हे सर्वात महत्त्वाचे होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी रेस्क्यू टीमने वानरांच्या कळपाचा शोध घेतला. परंतु कळप कुठे सापडला नाही. चुकीच्या कळपात सोडणे हेही पिलासाठी धोकादायक होते. म्हणून कळप मंदिराजवळ परत यायची वाट पहायची हे रेस्क्यू टीमने ठरवले.

दोन दिवस, चार दिवस गेले कळप काही परत येईना. मात्र रेस्क्यू टीमची चिंता वाढत होती. टीमला मुख्य चिंता पिलांच्या आईची होती, ती सुखरूप असावी हेच अपेक्षित होते. 8 तारखेला टीमने पुन्हा एकदा कळपाचा शोध घेतला, परंतु कळप त्यांच्या नेहमीच्या कोणत्याच जागी दिसला नाही.अखेर 10 तारीख आली, सायंकाळी 5.30 वाजले होते आणि रेस्क्यू टीमला शेजारील काकींनी कळप आल्याचे कळवले. सर्व टीम आनंदी झाली. पिलांची आई सर्वात पुढे दिसली आणि कळप अजून मागेच होता, बहुदा तिला तिच्या पिलांची चाहूल लागली असावी. पिलाचा आवाज ऐकताच ती कावरीबावरी झाली, तिला आनंद आणि चिंता या दोन्ही अनुभवात ती भारावून गेली होती व झाडावर उड्या मारत होती.रेस्क्यू टीमने लगेच पिलू एका घराच्या छतावर सुरक्षित ठिकाणी ठेवले. पिल्लाला पाहताच वानर आई जवळच्या झाडावरून घरावर आली, तिने पिलाला छातीशी घट्ट कवटाळले आणि घराच्या उंच ठिकाणी घेऊन गेली. तिथे बसून ती सर्व रेस्क्यू टीमकडे पाहत होती, जणू सर्वांना धन्यवाद देत होती. हा सर्व सुखद क्षण पाहून रेस्क्यू टीममधील सदस्यांना अश्रू अनावर झाले.

You May Also Like