पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे… काय म्हणाले पालकमंत्री….

कोल्हापूर । जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळं पंचगंगेसह प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.  जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण झाला आहे.  ‘एनडीआरएफ’च्या बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. आणखी दोन दिवस मोठा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पूरग्रस्तांच्या स्थलांतराला सुरुवात केली आहे.

“२०१९ च्या महापूरावेळी राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ५५.६ फुट होती. त्यावेळी महापूराचा त्रास झाला होता याची जाणीव आपल्या सर्वांना आहे. आज दुपारी ही पातळी ५३.६ फूटांपर्यंत पोहोचली आहे. ही पातळी ५५.६ पेक्षाही पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीय. २०१९ पेक्षा याची तीव्रता जास्त असणार आहे. २०१९ पेक्षा मोठा पूर येण्याची शक्यता आहे, तरी २०१९ च्या वेळी पूरबाधीत झालेल्या घरातील लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची भूमिका घ्यावी. जिल्ह्यातील सर्व आणि शहरातील सर्व लोकांना विनंती आहे की प्रशासनाला सहकार्य करावं”, असं पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

 

“जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने पडणाऱ्या पावसाचा परिणाम प्रचंड होणार आहे.  उद्या सकाळी राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले जातील. त्यातून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे आजची रात्र खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आजच सुरक्षित ठिकाणी जावं. तसेच शहरातील नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर येऊ नये,” अशी विनंती देखील पालकमंत्र्यांनी केली आहे.

You May Also Like