आयएसच्या हल्ल्यात बोको हरामचा कुख्यात कमांडर ठार

अबूजा : पश्चिम आफ्रिकन देशांमध्ये दहशत माजवणार्‍या बोको हराम या दहशतवादी संघटनेचा कुख्यात म्होरक्या अबूबकर शेकाउ हा ठार झाला आहे. बोको हरामचा विरोधी गट असलेल्या इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिकन प्रोव्हिन्ससोबत झालेल्या संघर्षात शेकाउ ठार झाला आहे. इस्लामिक स्टेटने एका ऑडिओ रेकोर्डिंगमध्ये रविवारी अबूबकर ठार झाला असल्याचे सांगितले. इस्लामिक स्टेटसोबत 18 मे रोजी झालेल्या संघर्षात अबूबकर शेकाउ हा घेरला गेला होता. त्यावेळी त्याने स्फोट करून आत्महत्या केली असल्याचे म्हटले जाते.

इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिकन प्रोव्हिन्सचा नेता अबू मुसाब अल बरनावीने आपल्या ऑडिओमध्ये बोको हरामचा कमांडर ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. अबूबकर शेकाउ सोबत ईश्वराने न्याय केला असल्याचे बरनावीने म्हटले. नायजेरियातील याआधी मागील महिन्यात नायजेरियाच्या सैन्याने शेकाउच्या कथित मृत्यूबाबत चौकशी करत असल्याचे म्हटले होते.

लेक चाड भागातील संघर्षा दरम्यान अबूबकर ठार झाला. बोको हरामवर संशोधन करणार्‍या बुलामा बुकार्तीने सांगितले की, इस्लामिक स्टेट लेक चाड भागात आपले वर्चस्व निर्माण करत आहे. हा भाग बोको हरामचा गड समजला जातो.

You May Also Like