कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत झालेला मृत्यूंच्या संख्येवर नेहमीच प्रश्न उपस्थित करण्यात आले

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत झालेला मृत्यूंच्या संख्येवर नेहमीच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यात स्मशानात लागलेल्या मृतदेहांच्या रांगा आणि गंगेत सापडलेल्या मृतदेहांमुळे हा संशय अधिकच बळावला. आता खुद्द बिहार सरकारने कोरोना मृतांची संख्या लपवल्याची कबुली दिली आहे.

बिहार राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 5 हजार 424 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. पण आरोग्य विभागाने राज्यात आतापर्यंत 9 हजार 375 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. तसेच आकडेवारी देण्यात चूक झाल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले.

राज्यात झालेल्या कोरोना मृतांची आकडेवारीचा तपास करण्यासाठी सरकारने 18 मे रोजी दोन समित्या स्थापन केल्या होत्या. राज्यात मृतांच्या आकडेवारीत कमालीचा हलगर्जीपणा दाखवल्याचे तपासात निष्पण्ण झाले.

आकडेवारी का चुकली याचे कारणे प्रशासनान दिली आहेत. अनेकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ते दुसर्‍या जिल्ह्यात गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. काही रुग्णांचा मृत्यू रुग्णालयात नेताना झाला तर अनेक रुग्णांचा मृत्यू कोरोनातून बरे झाल्यानंतर झाला त्यामुळे कोरोना मृतांचा नेमका आकडा कळाला नाही असा तर्क प्रशासनाने मांडला आहे.

असे असले तरी विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर मृतांचा आकडा लपवल्याचा आरोप केला आहे. सरकारने आता जरी खरी आकडेवारी जारी केली असली तरी बिहारच्या ग्रामीण भागात असंख्य लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.

You May Also Like