आयपीएल 2021चा दुसरा टप्प्याला टी-20 विश्वचषकाचा अडथळा?

मुुंबई : करोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणि करोनानं बायो बबल छेदल्यानंतर आयपीएल २०२१ स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आता उर्वरित ३१  सामने कधी व केव्हा खेळवणार याची चाचपणी बीसीसीआयकडून सुरू करण्यात आलीय.

बीसीसीआय सप्टेंबरच्या विंडोचा विचार करत आहे. पण, फक्त विंडोचे एकच आव्हान बीसीसीआयसमोर नाही, तर उर्वरित सामने कुठे खेळवायचे आणि त्यावेळी खेळाडू उपलब्ध असतील का, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे बीसीसीआयच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. राजस्थान रॉयल्सचे मालक मनोज बदले यांनी यंदा ही स्पर्धा शक्य नाही, याचे संकेत दिले.

भारताचा माजी कर्णधार व बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यानं उर्वरित सामने भारतात होणार नाही, हे आधीच स्पष्ट केले. त्यानंतर श्रीलंका, इंग्लंड व यूएई असे पर्याय समोर आले. आयपीएलचे उर्वरित सामने न झाल्यास बीसीसीआयला २५०० कोटीच्या नुकसानाला सामोरे जावे लागेल हेही गांगुलीनं मान्य केलं.

इंग्लंड, न्यूझीलंड, अफगाणिस्तानचे खेळाडूंची उपलब्धता
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाचे संचालक अ‍ॅश्ली जाईल्स यांनी आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना इंग्लंडचे खेळाडू उपलब्ध नसतील हे आधीच स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय वेळापत्रकानुसार इंग्लंड, न्यूझीलंड हे संघ सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानसोबत यूएईत मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहेत. त्यानंतर इंग्लंड-बांगलादेश यांच्यात मालिका होणार आहे. अफगाणिस्तान – पाकिस्तान यांच्यातही मालिका होणार आहे. त्यामुळे आयपीएल २०२१ च्या दुसर्‍या टप्प्यात परदेशी खेळाडूंचा समावेश शक्य नाही.

आयपीएलला यूएईचे मैदान उपलब्ध?
आयपीएल २०२१चे उर्वरित सामने कुठे खेळवायचा हा मोठा प्रश्न बीसीसीआयसमोर आहे. कोरोना नियमांमुळे इंग्लंडमध्ये सामने खेळवण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझींना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे आव्हानात्मक असेल. अशात यूएई हा पर्याय समोर आहे, परंतु सप्टेंबरच्या विंडोत पाकिस्तानचा संघ यूएईत न्यूझीलंड व अफगाणिस्तानचा सामना करणार आहे. अशात जर ट्वेंटी- २० वर्ल्ड कपही यूएईत घेण्यास ठरले, तर आयसीसी सर्व स्टेडियम आधीच बूक करतील. अशात बीसीसीआयची अडचण अधिक वाढेल.

आयसीसीची परवानगी नाही
बीसीसीआयचा जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा असला तरी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी आयपीएल २०२१ च्या दुसर्‍या टप्पा खेळवण्याच्या बीसीसीआयच्या प्रयत्नांना आयसीसीकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी आहे. आयसीसीच्या नियमानुसार स्पर्धेच्या ७ दिवस आधी आणि ७ दिवस नंतर कोणत्याही प्रकारच्या मार्केटिंग अ‍ॅक्टिव्हिटींनी आयसीसीची परवानगी नाही.

भारतानं दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंडला दिलंय वचन
ट्वेंटी- २० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी बीसीसीआयनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळण्याचे कबुल केले आहे. २०२० मध्ये उभय संघांतील मालिका करोनामुळे रद्द करण्यात आली होती. ती मालिका आता खेळवण्यात येईल, त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध मालिका होईल. आयपीएल २०२१साठी बीसीसीआयला या मालिका रद्द किंवा स्थगित कराव्या लागतील, पण त्यासाठी आफ्रिका व किवी तयार होतील का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप
आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनात प्रमुख अडथळा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी १५ दिवसांच्या विंडोत आयपीएल खेळवणे अवघड आहे. वेस्ट इंडिज व ऑस्ट्रेलिया यांच्याकडून याला विरोध असेल.

You May Also Like