बस आणि लोकलसाठी एकच तिकीट : उद्धव ठाकरे

मुंबई । मुंबईकर प्रवासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील प्रवाशांना यापुढं तिकिटांच्या रांगेत फार वेळ ताटकळत उभं राहावं लागणार नाही. कारण, सर्व प्रकारच्या बेस्ट बस आणि लोकल प्रवासासाठी एकच पास किंवा तिकीट चालू शकणार आहे. त्या दृष्टीनं नियोजन सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

 

बेस्टच्या वर्धापन दिनानिमित्त माहीम नुतनीकृत बस डेपोचे आणि बेस्टच्या नवीन २४ इलेक्ट्रिक बसेसचे अनावरण आज करण्यात आले. त्या प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. ‘करोनाच्या काळात बेस्टनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच प्रवासी यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली व कुठेही अडचण येऊ दिली नाही. जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. करोना काळात बेस्ट अधिकारी आणि कर्मचारी देखील कारोनाग्रस्त झाले, काहींचे मृत्यू झाले पण तरीदेखील बेस्ट थांबली नाही,’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

 

‘बेस्ट आणि लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. गेल्या काही काळापासून निसर्गचक्र बदलत आहे. आपलं पर्यावरण जपलं गेलं पाहिजे. त्या दृष्टीनं इलेक्ट्रिक बस हे बेस्टचे क्रांतिकारक पाऊल आहे. माहीम बस डेपोचं आधुनिकीकरण झाल्यामुळं कर्मचाऱ्यांना सुविधा मिळेलच, शिवाय प्रवाशांना देखील दिलासा मिळणार आहे. शिस्तबद्ध सेवा ही बेस्टची ख्याती आहे. बेस्टच्या कोणत्याही कामात काही अडचण आल्यास सरकारकडून आवश्यक ते सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही,’ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

You May Also Like