देशावर कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संकट ओढवले

जळगांव : सर्व देशावर कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संकट ओढवले आहे. त्यातच सध्या कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने ती लहान मुलांसाठी सर्वात धोकेदायक असल्याने शासनाने लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पण, मागील दिड वर्षांपासून सुरु असलेल्या सततच्या लॉकडाउन मुळे सामान्य नागरिकांसह मजूर वर्ग हवालदिल झाला आहे. या परिस्थितीमुळे त्यांचं जगणं अवघड झालंय, या सर्व परिस्थितीत आपला संसाराचा गाडा चालवत असतानाच आपल्या लहान मुलांची काळजी कशी घेणार? हे मोठं संकट त्यांच्या समोर उभं राहिलंय. अजूनही बरीचशी कुटुंब आर्थिक हलाखीच्या परिस्थितीत आहेत. दैनंदिन उदरनिर्वाह करणे देखील त्यांना कठीण झाले आहे. अशातच कृती फाउंडेशन व ए वन्स इव्हेंट्सने ही गोष्ट लक्षात घेऊन या गरजू कुटूंबांच्या मदतीला धाऊन आली आहे. कृती फाऊंडेशन व ए वन्स इव्हेंट्स नाशिक तर्फे नाशिक शहरातील पेठ रोड, गोदाकाठ, रामकुंड, मुंबई नाका परिसरातील हातावर पोट असलेल्या गरजू कुटुंबातील लहान मुलांना आरोग्यदायी शक्तीवर्धक सुकामेवा कीट वाटप करण्यात आले. तसेच काही कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू देखील वाटप करण्यात आल्या. सदर किट मध्ये लहानमुलांच्या आरोग्यासाठी गुणकारी खजूर, खारिक, बिस्किट्स, एनर्जी बार, शेंगदाणा व तिळ चिक्की, राजगीरा लाडू तसेच इतर पदार्थांचा समावेश होता. सदर उपक्रम कृती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष व पोलिस अधिक्षक कार्यालयातील बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी तसेच ए वन्स इव्हेंट्सच्या संचालिका दिपाली विसपुते यांच्या पुढाकाराने तर पोलिस आयुक्तालय नाशिक, पोलिस बिनतारी संदेश विभागाचे विवेक माळवे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी सिड्स ऑफ होप क्लब पुणे व विवेक माळवे यांचे आर्थिक सहकार्य लाभले. लहान मुलांना सुकमेवा हा सामाजिक दायित्व म्हणून वाटप करण्यात आला. कोरोनाने आरोग्याचे व सदृढ आहाराचे महत्व अधोरेखित केले आहे. सहकार्याच्या भावनेतून एकमेकांना मदत करणे गरजेचे असल्याचे विवेक माळवे यांनी सांगितले. प्रसंगी राहुल भालेराव, भाग्यश्री महाजन, भाग्यश्री भावसार आदींनी परिश्रम घेतले.

You May Also Like