निलंबित पोलीस निरीक्षक याला तोफखाना पोलिसांनी नाशिक येथे पकडले

तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यामधील फरार व निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ याला तोफखाना पोलिसांनी आज नाशिक येथे शिताफीने पकडले, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली. दरम्यान, विकास वाघ याला न्यायालयाने 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

निलंबित पोलीस निरीक्षक वाघ याच्याविरोधात महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात मारहाण, अत्याचार आणि हनीट्रपमध्ये अडकविण्याची धमकी दिल्याची फिर्याद दाखल केली होती. तेव्हापासून वाघ फरारी होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तोफखाना पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.

निलंबित असलेला वाघ तीन महिन्यांपासून फरार होता. तो नाशिक येथे असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शोध पथकातील प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सूरज मेढे यांच्यासह पथकातील सय्यद शकील, अविनाश वाकचौरे, सचिन जगताप यांनी नाशिक येथे भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा रचून वाघ याला अटक केली. तोफखाना पोलिसांनी वाघ याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने वाघ याला 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान, वाघ याला पकडायला तोफखाना पोलिसांचे पथक गेले असता, वाघ याने घरातील मौल्यवान वस्तू समोर फेकत चोरी झाल्याचा बनाव तयार केला. याचाच आधार घेत वाघ तक्रार करण्याची शक्यता आहे.

You May Also Like