तिसरी लाट आलीच; डब्ल्यूएचओने केलं अलर्ट

करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत WHO ने केली घोषणा  

जिनिव्हा ।  जागतिक आरोग्य संघटनेनंच कोरोनाची तिसरी लाट आल्याची घोषणा केली आहे. डब्ल्यूएचओने  जगात तिसऱ्या कोरोना लाटेची सुरुवात झाल्याचं सांगितलं आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस गेब्रेयेसस यांनी आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यात आलो आहोत, असं सांगत सर्व देशांना अलर्ट केलं आहे. बुधवारी त्यांनी ही माहिती दिली.

डॉ. टेड्रोस गेब्रेयेसस यांनी सांगितलं, कोरोनाव्हायरस सातत्याने स्वतःमध्ये बदल करत आहे. सोबतच तो अधिक संसर्गजन्यही होतो आहे. डेल्टा व्हेरिएंट आता  111 पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचला आहे. लवकरच हा जगभर पसरू शकतो. अल्फा व्हेरिएंट 178 देशांत आहे. तर बिटा आणि गामा व्हेरिएंट अनुक्रमे  123 आणि 75 देशांमध्ये दिसून आला आहे. भारतात पहिल्या दोन लाटांचं स्वरूप पाहता तिसरी लाट येणं अटळ असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. दुसऱी लाट ओसरल्यानंतर नागरिकांमध्ये ज्या प्रकारची बेफिकिरी दिसत आहे, ती चिंताजनक असून तिसऱ्या लाटेचं गांभिर्य वाढवणारी असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशननं म्हटलं आहे.

 

दरम्यान, हेद्राबाद विद्यापीठातील भौतिकशास्त्र तज्ज्ञांनी तिसरी लाट 4 जुलैपासून सुरू झाली असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही दिवसात मृत्युंचा आकडा वाढला असून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे या निष्कर्षावर आल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तर पीटीआयच्या मते, UBS सिक्युरिटज इंडियाच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ तज्ज्ञ तन्वी गुप्ता जैन यांच्या मते, भारतात तीन मुख्य कारणांमुळेच तिसऱ्या लाटेचा मोठा धोका आहे. जैन म्हणाल्या, बहुतेक राज्यांमध्ये नियम शिथील केले जात आहेत. आर्थिक व्यवहार खुले केले जात आहेत आणि लसीकरणाचा वेगही मंदावला आहे. यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका अधिक वाढला आहे.

 

 

You May Also Like