काँग्रेसने स्वबळाचा सूर आवळलेला असला तरी दुसरीकडे शिवसेनेशी हातमिळवणी कायम ठेवण्याचे राष्ट्रवादीने जाहीर

मुंबई : एकीकडे काँग्रेसने स्वबळाचा सूर आवळलेला असला तरी दुसरीकडे शिवसेनेशी हातमिळवणी कायम ठेवण्याचे राष्ट्रवादीने जाहीर केले आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्याच राष्ट्रवादीला झटका दिल्याच्या चर्चा सुरु असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी परळमधील टाटा रुग्णालयातील कॅन्सरग्रस्तांसाठी म्हाडाच्या 100 खोल्या राखीव ठेवणार असल्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केला होता. पण मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सरग्रस्तांसाठी या म्हाडाच्या खोल्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारानंतर राखीव ठेवण्यात आल्या होत्या. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते या खोल्यांच्या चाव्यांचे वाटपही करण्यात आले होते. पण या विरोधात शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी तक्रार केली होती. कॅन्सरग्रस्तांसाठी ज्या इमारतीमधील खोल्या राखीव ठेवण्यात आल्या होत्या, त्या इमारतीमधील रहिवाशांची तक्रार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला स्थगिती दिली आहे. पण मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी कोणत्याही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली नाही आणि परस्पर या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे आता महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोणतीही चर्चा न करता राष्ट्रवादीने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत मतमतांतरे आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लवकरच यासंदर्भातील खुलासा आणि एवढ्या मोठ्या निर्णयाला स्थगिती का देण्यात आली, याबाबतचे स्पष्टीकरण जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे संपूर्ण भारतातून कॅन्सरबाधित रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. मात्र, अनेकवेळा येथे येणारे रुग्ण हे गरीब घरातून असल्यामुळे रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांसाठी राहण्याच्या जागेचा प्रश्न निर्माण होत असतो. अनेक वेळा हे नातेवाईक हॉस्पिटलच्या आजुबाजूच्या परिसरात मिळेल त्या ठिकाणी, फूटपाथावर, पुलाखाली राहत असतात. त्याच्याबद्दलची कैफियत अनेकवेळा माध्यमांमधून मांडण्यात आली आहे.

You May Also Like

error: Content is protected !!