राज्यात तीन पक्षांचे सरकार, पण त्यांच्यात संवाद नाही : सदाभाऊ खोत

साक्री : करोना काळात राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित न झाल्याने सर्वसामान्य करोनाग्रस्त रुग्णांना कर्ज काढून लाखो रुपयांची बीले भरावी लागली त्यामुळे महाराष्ट्रातील दवाखाने कर्जमुक्त झालेत. तर करोनाग्रस्त मात्र कर्जबाजारी झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी कृषी मंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ.सदाभाऊ खोत यांनी साक्री येथे कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन करताना केले.

माजी मंत्री सदाभाऊ खोत उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असुन साक्रीच्या विश्रामगृहावर संघटनेच्या व भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास भदाणे, शेतकी संघाचे चेअरमन विलास बिरारीस, संचालक देवीदास पाटील, ड.गजेंद्र भोसले, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे, तालुकाध्यक्ष वेडू सोनवणे, बापुसाहेब गीते, शहराध्यक्ष कल्याण भोसले, रंगा भवरे, डॉ.एम.डी.मारनर तालुका सरचिटणीस विजय देसले, योगेश भामरे, विनोद पाटील, विनोद पगारीया यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की, या तीन पक्षाच्यया सरकारमध्ये संवादाचा अभाव असुन प्रत्येक पक्षाचा मंत्री वेगवेगळे निर्णय जाहीर करथ असतो. त्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील शेतकर्‍यांची विमा कंपन्यांनी फसवणूक केली. मात्र याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. चक्रिवादळाने शेतकर्‍यांचे अपरिमित नुकसान झाले. अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. मात्र पंचनामे करुनही शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, विजमाफी मिळाली नाही, 100 यूनीटचे वीजबील माफी मिळाली नाही. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एफ.आर.पी. रक्कम मिळाली नाही. राज्यातील दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आपली भूमिका मांडतांना आ.सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाची लढाई ही प्रस्थापित मराठे विरुद्ध विस्थापीत मराठे अशी सुरु आहे. देवेंद्र फडणवीस हा अल्पसंख्याक माणुस मुख्यमंत्री झाला म्हणून विस्थापीत मराठ्यांना आरक्षण मिळाले. त्यांनी दिलेले आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकविता आले नाही. आणि या महाविकास आघाडी सरकारचा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. तो म्हणजे केंद्राकडे बोट दाखवून मोकळे होणे. आज या सरकारकडून शुध्द फसवणूक सुरु असुन या सर्वांचा जाब येत्या पावसाळी अधिवेशनात द्यावा लागणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले. या बैठकीचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन विजय भोसले यांनी केले.

You May Also Like