50 हजारांच्या मदतीसह अडीच हजार पेन्शन; केजरीवालांच्या मोठ्या घोषणा

नवी दिल्ली : करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र दिसत आहे. दररोज दोन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत असल्यानं धोका कायम आहे. त्यामुळे दिल्ली सरकारनं अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. रेशन दुकानांतून धान्य खरेदी करत असताना त्यांच्याकडून माफक रक्कम घेतली जायची. मात्र आता तसं होणार नाही. प्रत्येक कार्डधारकाला दर महिन्याला 10 किलो मोफत धान्य मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलीयं.

करोनामुळे घरातील व्यक्ती गमावलेल्या कुटुंबासाठी दिल्ली सरकारनं अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. करोनामुळे कमावती व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांना 50 हजार रुपयांची मदत करण्यात येईल. याशिवाय त्या कुटुंबाला दर महिन्याला अडीच हजार रुपयांची पेन्शन देण्यात येणार आहे.

काही व्यक्तींकडे रेशन कार्ड नाही. मात्र अशा व्यक्तींना रेशनची आवश्यकता असेल, तर त्यांना रेशन मोफत दिलं जाईल. दिल्लीतील रेशन कार्डधारकांची संख्या 72 लाख इतकी आहे. त्यांना सध्या केंद्राकडून 5 किलो धान्य मिळत आहे. आता त्यांना दिल्ली सरकारकडून 5 किलो धान्य मिळेल. त्यामुळे नागरिकांना महिन्याला 10 किलो धान्य मिळेल. कोरोना संकटामुळे अनेक कुटुंब अडचणींचा सामना करत आहेत. एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचं निधन कोरोनामुळे झालं असल्यास त्या कुटुंबाला 50 हजार रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा केजरीवालांनी केली.

 

You May Also Like