गावठी कट्ट्यासह दोघांना अटक

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरूद्वारासमोर पुलाखाली ट्रक घेवून आलेल्या दोघांनी गावठी कट्टा व काडतूस विकण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. गावठी कट्टा, काडतूससह त्यांच्या ताब्यातील ट्रकही जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गुरूद्वारासमोरील पुलाखाली एम.एच.18/बीजी 7889 या ट्रकमध्ये गावठी कट्टा व काडतूस विक्रीचा व्यवहार होत असल्याची खबर मिळाल्याने मोहाडी पोलिसांनी लागलीच तेथे धाव घेतली. यावेळी ट्रकमधील दोघांची अधिक चौकशी करीत झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात एक गावठी कट्टा व काडतूस आढळून आले. हा कट्टा व काडतूस विक्री करण्याचा त्यांचा उद्देश असल्याने पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले.

आरीफ नवाब खान (32) रा.देवास, म.प्र. व अब्दुल जावेद अब्दुल लतीफ शेख (42) रा.देवास, म.प्र. अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे असून त्यांच्या ताब्यातील पाच लाख रूपये किंमतीच्या ट्रकसह 15 हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा व 500 रूपये किंमतीची काडतूस मिळून 5 लाख 15 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोकॉ.अजय दाभाडे यांची फिर्याद नोंदवून घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक एम.आय.मिर्झा करीत आहेत.

You May Also Like