देशात ‘उज्ज्वला’चा गाजावाजा, पण महागाईच्या भडक्यानं ९० लाख लोकांची सिलेंडर खरेदीकडे पाठ

भोपाळ । मध्यप्रदेशमधील भोपाळमधील 61 वर्षीय रामकली यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन मिळालं आहे. रामकली बाई या भोपाळमधील रोशनपुरा येथील झोपडपट्टीजवळ वास्तव्यास आहेत. रामकली बाई यांना दरमहा विधवा पेन्शन म्हणून ६०० रुपये मिळतात. या सहाशे रुपयांमध्ये मी गॅसचा सिलेंडर भरुन आणायचा की लाईटची बिलं भरायचं असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. रामकली या गेल्या वर्षभरात एकदाच सिलेंडर खरेदी करु शकल्या आहेत, असं त्या सांगतात. एलपीजी गॅसवर 1 हजार खर्च केले तर खाणार काय असा प्रश्न त्या विचारतात.
रामकली बाई म्हणतात माझी आर्थिक परिस्थिती खराब असल्यानं मला सरकारकडून गॅस कनेक्शन देण्यात आलं. मला दोन मुलं होती, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गेल्या ७ महिन्यांपासून बेपत्ता आहे. आता मला सरकारकडून ६०० रुपये पेन्शन मिळते. आता मी चुलीवर जेवण बनवते, जर मी एलपीजी गॅस सिलेंडर घेतला तर माझ्याकडे खाण्यासाठी पैसे देखील राहणार नाहीत, असं त्या म्हणाल्या.
रामकली बाई या गॅस सिलेंडर खरेदी करु न शकणाऱ्या एकट्याच नाहीत. देशातील उज्ज्वला योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी ९० लाख गॅस कनेक्शनधारकांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षात गॅस सिलेंडर खरेदी केलेला नाही. तर, 1 कोटी 8 लाख ग्राहकांनी मागील आर्थिक वर्षात फक्त एकदाच गॅस भरुन घेतला आहे. इंडियन ऑईल कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपन्यांकडून ही माहिती माहितीच्या अधिकारांतर्गत मिळाली आहे.
चंद्रशेखर गौर हे नीमच येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं त्यांना दिलेल्या माहितीनुसार६५ लाख ग्राहकांनी २०२१-२२या आर्थिक वर्षात एकदाही सिलेंडर खरेदी केला नाही. तर, ५२ लाख ग्राहकांनी गेल्या आर्थिक वर्षात एकदाच सिलेंडर भरुन नेला आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियमनं दिलेल्या माहितीनुसार ९ लाख १७ हजार ५०० ग्राहकांनी गेल्या आर्थिक वर्षात एकदाही सिलेंडर खरेदी केलेला नाही. तर, २७.५८ लाख ग्राहकांनी फक्त एकदा सिलेंडर खरेदी केला आहे. भारत पेट्रोलियमकडून गौर यांनी मिळवलेल्या माहितीनुसार २८.५६ लाख ग्राहकांनी एकदा सिलेंडर खरेदी केला आहे. तर, १५.९६ लाख ग्राहकांनी एकदाही गॅस सिलेंडर खरेदी केला नाही.
उज्ज्वला योजनेअंतर्गत एचपीसीएलचे २ कोटी ४० लाख ग्राहक आहेत. आयओसीएलचे ४ कोटी २४ लाख ग्राहक तर बीबपीसीएलचे २ कोटी ३५ लाख ग्राहक आहेत. देशभरात उज्ज्वला योजनेचे एकूण ८.९९ कोटी ग्राहक आहेत. त्यापैकी ९० लाख ग्राहकांनी गॅस सिलेंडर खरेदी केलेला नाही. तर, १ कोटी ८ लाख ग्राहकांनी फक्त एक सिलेंडर एका वर्षात खरेदी केला आहे.

You May Also Like