अबब.. गायीच्या पोटाची शस्त्रक्रिया करून मिळाली एक तोळ्याची सोन्याची अंगठी

निफाड : कठीण समय येता कोण कामास येतो या उक्तीप्रमाणे डॉक्टर सुशील कोळपे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोळगाव तालुका निफाड येथील विनायक वाघ यांच्या गायीवर अथक प्रयत्नातून यशस्वी शस्त्रक्रिया करून पोटातून दोन खिळे, पत्र्याचे तुकडे, खडी व एक तोळ्याची अंगठी काढली आहे.

निफाड तालुक्यातील कोळगाव येथील प्रगतिशील शेतकरी विनायक वाघ यांचे शेतकरी कुटुंब असुन शेती व्यवसायाला जोड धंदा म्हणून दुग्ध पालनासाठी त्यांनी गाय पाळली होती परंतु ही गाय बरेच दिवस झाले चारा खात नाही व पाणी ही पित नाही हे त्यांच्या लक्षात आले असता गायीची एकंदरीत परिस्थिती बघता यासंदर्भात त्यांनी मंजूर येथील डॉ.सोनवणे यांना गाईला तपासणीसाठी बोलवले असता त्यांनी वैद्यकीय भाषेत, ‘फॉरेन बॉडीची’ म्हणजे पोटात काहीतरी गिळले असल्याची शक्यता व्यक्त केली. त्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेची असल्याचा सल्ला दिला. त्यानुसार संदर्भीय उपचारासाठी कोळपेवाडी येथील डॉ.सुशील कोळपे यांना बोलवले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विलंब न करता गायीची तातडीने जागेवरच शस्त्रक्रिया केली असता तिच्या पोटातून बारीक खिळे, बारीक पत्रे आणि त्याचबरोबर गायीच्या पोटातून निघाले असे काही की, बघणारे थक्क झाले.

तीन महिन्यांपूर्वी विनायक वाघ यांच्या पत्नीची चारा कापताना एक तोळ्याची सोन्याची अंगठी हरवली होती ती शोधूनही सापडली नाही. मात्र शस्त्रक्रिया केल्यावर गायीच्या पोटातून ती अंगठी जशीच्या तशी निघाली. ही अंगठी बघून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. हिंदू संस्कृती मध्ये गाईला मातेची उपमा दिलेली आहे. गाईंपासून दुग्धोत्पादन हा शेतकऱ्यांना अर्थिक मदत देणारा शाश्वत व्यवसाय तर आहेच मात्र केवळ आर्थिक प्राप्ती म्हणून नव्हे तर एरवी देखील शेतकरी जनावरांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागवतात. त्यामुळे गायीच्या आजारपणाच्या चिंतेत असणाऱ्या वाघ कुटुंबियांना गाय आजारपणातुन बरी होण्याबरोबरच हरवलेले सोने देणे हा मोठा आर्थिक आधारच असल्याने गायीचा जीव वाचला. अवघड शस्त्रक्रिया करून गायीचा जीव वाचविल्या बद्दल डॉक्टरांचे आभार मानताना बळीराजाचे डोळे देखील पाणावले. अवघड शस्त्रक्रिया करून गाईच्या पोटातून खिळे खडी व पत्र्याचे तुकडे तसेच सोन्याची अंगठी काढून यशस्वी शस्त्रक्रिया केल्या बद्दल डॉक्टरांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.

बऱ्याच वेळा जनावरांच्या पोटात चाऱ्यातून खिळे किंवा तत्सम वस्तू जातात त्यामुळे जनावरांच्या आतड्यांना इजा होते, वैद्यकीय भाषेत त्याला फॉरेन बॉडी म्हटले जाते ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची व जोखमीची असते त्याचबरोबर तातडीने निर्णय घ्यावा लागतो.
– डाॅ. सुशिल बानाजी कोळपे. कोळपेवाडी.

You May Also Like