बारामती – कोरोना सारख्या जागतिक महामारी मुळे टेलरिंग व्यावसायिकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड

बारामती – कोरोना सारख्या जागतिक महामारी मुळे बारामतीतील टेलरिंग व्यावसायिकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. गेले वर्षभरापासून टेलरिंग व्यवसाय अडचणीत आला असून बारामतीतील जवळपास १ हजार५०० हून अधिक टेलर काम करणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने मदतीचा हात द्यावा अशी मागणी टेलर व्यावसायिक संघटनेने केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

कोरोणासारख्या महामारी मुळे बारामतीतील टेलरिंग व्यवसायाला कात्री लागली आहे.लॉकडाऊनमुळे दुकाने बंद राहिल्याने व्यवसायिक तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेले इतर मजूर देखील आर्थिक अडचणीत आले आहेत. दुकाने बंद असले तरी दुकान भाडे ,तसेच लाईट बिल व इतर खर्च सुरूच आहेत. दुकान भाडे थकल्याने दुकाने खाली करा अशी तंबी दुकान मालकांनी देखील या व्यावसायिकांना दिले आहे. त्यामुळे टेलरिंग व्यवसायिकांच्या अडचणीत भर पडली आहे. टेलरिंग हेच एकमेव उदरनिर्वाहाचे साधन असून कोरोनाच्या परिस्थितीमुळे वर्षभरापासून मशीनचे चाकच फिरले नाही त्यामुळे उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न या व्यवसायिकांन समोर उभा आहे. सरकारने टेलरिंग व्यवसायिकांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अनिल सरोदे, दिनेश सूर्यवंशी ,नवनाथ पवार ,अनिल सावंत ,संतोष जवंदळ, संतोष कुंभार ,सुनील सरोदे ,राजेंद्र शेंडे ,महेश कुलते आदी व्यवसायिकांनी ही मागणी केली आहे.

बारामतीत दोनशेहून अधिक टेलरिंगची दुकाने आहेत. जवळपास दीड हजार कारागीर व मजूर या व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र गेल्या वर्षभरापासून या व्यवसायाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटली असून उदरनिर्वाहासाठी टेलरिंग व्यावसायिकांची ससेहोलपट सुरू आहे. इतर व्यावसायिकांना ज्याप्रमाणे सरकारने मदतीचा हात दिला आहे त्याप्रमाणे टेलरींग व्यवसायिकांना देखील मदत करावी. याबाबत संघटनेच्यावतीने उपमुख्यमंत्री अजितदाद पवार यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे.

You May Also Like