वीरपत्नी ’लेफ्टनंट’ निकिता कौल धौंडियाल भारतीय सैन्यात रुजू

नवी दिल्ली : काश्मीरच्या पुलवामा भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या मेजर विभूती शंकर धौंडियाल यांची पत्नी निकिता कौल धौंडियाल या शनिवारी भारतीय सैन्यात ’लेफ्टनंट’ पदावर दाखल झाल्या आहेत.

तामिळनाडूच्या चेन्नई अधिकारी ट्रेनिंग अकादमीत आज पासिंग आऊट परेड पार पडली. लष्कराच्या उत्तर कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल योगेश कुमार जोशी यांनी या पासिंग आऊट परेडचं निरीक्षण केलं. लेफ्टनंट जनरल योगेश कुमार जोशी यांनी चेन्नईत निकिता कौल यांच्या खांद्यावर स्टार चढवले.

’2019 साली पुलवामात सर्वोच्च बलिदान देणार्‍या मेजर विभूती शंकर धौंडियाल यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. आज त्यांची पत्नी निकिता कौल यांना सेनेची गणवेशत परिधान करत आपल्या पतीला सर्वश्रेष्ठ श्रद्धांजली अर्पण केलीय. हा त्यांच्यासाठी निश्चितच एक अभिमानाचा क्षण आहे, लष्कर कमांडर लेफ्टनंट वाय के जोशी यांनी त्यांच्या खांद्यावर स्टार चढवले’ असं ट्विट करण्यात आलंय. जनसंपर्क अधिकारी उधमपूर या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर या कार्यक्रमाचा एक क्षण व्हिडिओ स्वरुपात जाहीर करण्यात आला आहे.

 

You May Also Like