कोरोना लढ्यासाठी विराट-अनुष्का यांनी जमा केला रिकॉर्डतोड निधी; मानले सर्वांचे आभार!

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी कोरोना लढ्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेतून रिकॉर्डतोड निधी गोळा केला आहे. विराट व अनुष्का यांनी Ketto सोबत आठवडाभरापूर्वी एक मोहीम सुरू केली आणि सुरुवातीला त्यांनी ७ कोटींचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. हा जमा होणारा निधी भारताच्या कोरोना लढ्यासाठी दान करण्यात येणार आहे. विराट व अनुष्का यांनी केवळ मोहिमेसाठी दान करण्याचं आवाहन केलं नाही, तर त्यांनी स्वतः २ कोटी दान केले. काल MPL Sports Foundationनं ५ कोटींची मदत जाहीर केल्यानंतर ७ कोटींचं लक्ष्य पार झाले आणि विराटनं पुन्हा ११ कोटींचं लक्ष्य समोर ठेवले आणि आज तेही पार केले. विराट व अनुष्कानं या मोहिमेतून ११ कोटी ३९ लाख ११, ८२० जमा केले आहेत.

विराट कोहली म्हणाला, एकदा नव्हे तर दोनदा आम्ही लक्ष्य पार केले. ही आनंदाची बातमी करताना मन भरून आलंय आणि भावना मांडण्यासाठी शब्द कमी पडत आहेत. ज्यांनी ज्यांनी या मोहिमेत हातभार लावला त्या सर्वांचे आभार. आपण सर्व एकत्र येऊन हा लढा जिंकूयात.

अनुष्का म्हणाली, आपण सर्वांना दाखवलेल्या एकजुटता पाहून मी थक्क झालीय. आम्ही ठरवलेल्या लक्ष्यापेक्षा अधिक रक्कम जमा केल्याचं सांगताना अत्यानंद होत आहे आणि याने अनेकांचे जीव वाचवले जाऊ शकतात. सर्वांचे मनापासून आभार.

You May Also Like