राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत कोण-कोण?

नवी दिल्ली । राष्ट्रपती निवडणुकीची जोरदार चुरस निर्माण झाली आहे. बुधवारी विरोधकांची दिल्लीत बैठक झाली, ज्यामध्ये उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली. दुसरीकडे, सत्ताधारी भाजपच्यावतीने उमेदवाराच्या नावावर एकमत होण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह विरोधकांशी चर्चा करत आहेत.

देशात राष्ट्रपती निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया सुरु झाली आहे. बुधवारी सुरु झालेल्या प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी 11 जणांनी अर्ज दाखल केले. निवडणूक आयोगाने अर्ज भरण्याची मुदत 29 जूनपर्यंत ठेवली आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी विरोधकांची बैठक झाली, त्यात उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

राजनाथ सिंह यांनी काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजेडी प्रमुख नवीन पटनायक आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्याशीही चर्चा केली आहे. संरक्षणमंत्र्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशीही चर्चा केली. वृत्तानुसार, राजनाथ सिंह हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि इतर राजकीय पक्षांचे नेते यांच्याशी चर्चा करणार आहेत.

फारुख अब्दुल्ला यांचे नाव समोर
दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये बुधवारी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत विरोधी पक्षांच्यावतीने शरद पवार यांचे नाव पुढे करण्याचे मान्य करण्यात आले. मात्र, शरद पवार यांनी आपण उमेदवार होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पवारांनी नकार दिल्यानंतर विरोधक नव्या उमेदवाराच्या शोधात आहे.

विरोधकांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. त्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः शरद पवार यांनी त्यांच्या नावाला सहमती दर्शवली तर बरे होईल, असे म्हटले आहे. अन्यथा एकत्रित उमेदवारांच्या नावाचा विचार केला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत फारुख अब्दुल्ला यांच्या नावावरही चर्चा झाली. मात्र, ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या नावाला विरोध केला. यामध्ये आपल्या नावाची चर्चा करु नये, असे उमर म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ममता यांनी बैठकीत दोन नावे सुचवली. त्यात पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी आणि दुसरे नाव फारुख अब्दुल्ला यांचे आहे. पण या नावांवर कोणतीही चर्चा झाली नाही. उमेदवार निश्चित करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांची 21 जून रोजी पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती आहे.

विरोधक एकत्रित उमेदवार उभे करणार
विरोधकांच्या बैठकीत संयुक्त उमेदवार उभा करण्याचा निर्णय झाला आहे. सत्ताधारी भाजप उमेदवाराच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करण्याचे विरोधकांनी मान्य केले आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आम्ही एका सामान्य उमेदवाराला उभे करण्याचा निर्णय घेतला आहे, जो खरे तर राज्यघटनेचा संरक्षक असेल, असे विरोधकांच्या बैठकीनंतरच्या निवेदनात म्हटले आहे.

18 जुलै रोजी होणार्‍या 16 व्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार 29 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 30 जून रोजी कागदपत्रांची छाननी होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची शेवटची तारीख 2 जुलै आहे. 18 जुलै रोजी निवडणूक होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

एनडीएकडून कोण उमेदवार असू शकतो ?
विरोधी पक्षासह भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनेही उमेदवारांबाबत मौन बाळगले आहे. भाजप राष्ट्रपती कोविंद यांना दुसर्‍या टर्मसाठी पुन्हा नामनिर्देशित करण्याची शक्यता नाही. त्यामुळे अन्य अनेक उमेदवारांबद्दल अटकळ बांधली जात आहे.

पुढील राष्ट्रपती बनण्याची सर्वाधिक शक्यता
– आरिफ मोहम्मद खान
– द्रौपदी मुर्मू
– अनुसुईया उईके
– तमिलसाई सुंदरराजन –
– सुमित्रा महाजन
– मुख्तार अब्बास नक्वी

You May Also Like