शहराला विद्रुप करणार्‍यांवर कारवाई होणार का?

मनपाने दंडात्मक कारवाईसाठी पथक निर्माण करणे गरजेचे
धुळे : शहराच्या सौदर्यात भर पाडणार्‍या अनेक वास्तू उभारण्यात आल्या आहेत, तर काही नव्याने नावारूपास येवू लागल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याजवळ आय लव्ह धुळे सेल्फी पाईंट या सेेल्फी पॉईंटची निर्मिती स्वखर्चाने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी केली आहे. या ठिकाणी लघुशंका करण्याचे धारिष्ट्य काही समाजकंटकांकडून दाखविले जात आहे. शहराच्या विद्रुपीकरणात अग्रेसर राहणार्‍यांवर मनपाने दंडात्मक कारवाईसाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करावी अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.

रस्त्यांवर वा कार्यालयांच्या भिंतीवर थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून घाण करणे, सरकारी व सार्वजनिक मालमत्तांवर पोस्टर चिपकवून विद्रुपीकरण करणे, कचरा जाळणे वा रस्त्यांवर बांधकाम साहित्य ठेवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालीकेले पुढाकार घेतला पाहिजे. दोषींवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. शहरातील नागरिकांसह सामाजिक संघटनांनी पुढाकार घेवून घृणास्पद कृत्य करणार्‍यांना धडा शिकविलाच पाहिजे.
शहर स्वच्छ ठेवायची जबाबदारी केवळ मनपाच्या स्वच्छता विभागाचीच नाही. स्वच्छतेसाठी नेहमीच नगरसेवकांकडून आरोग्य विभागाला नेहमीच धारेवर धरले जाते. परंतू नागरीकच अस्वच्छता पसरविण्यात पुढे येत असतील तर मनपाला बोलूनही काही फायदा नाही. स्वच्छतेबाबत नागरीकांनीही मनपाला सहकार्य करणे महत्वपूर्ण ठरणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांना आळा घालावाच लागेल. पान, तंबाखू, गुटखा खाणारे वाहन चालविताना चौकात, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकतात. यामुळे सर्वत्र घाण होते, सोबतच यातून संसर्गजन्य आजार होण्याचा धोका असतो. एवढेच नव्हे तर कार्यालयाच्या भिंतीवर, शौचालय, स्वच्छतागृहात थुंकून घाण करतात. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाई झाली पाहिजे.

मुतार्‍यांची संख्या वाढविण्याची गरज
पांझरा नदी किनारी असलेल्या जुन्या चौपाटीच्या बाजूला सुलभ शौचालय व मुतारी उभारण्यात आली आहे. तशीच नदी पात्राच्या दुसर्‍या बाजूलाही सुलभ शौचालय व मुतारी उभारल्यास उघड्यावर लघुशंका कोणीही करणार नाही. संबंधित परिसरातील नगरसेवकांनी पाठपुरावा करून पांझरा नदी किनारी देवपूरच्या बाजूने मुतारी उभारण्यात यावी अशी मागणी महासभेत केल्यास स्वच्छतेचा प्रश्न सुटणार आहे.

पुतळ्यांचे विद्रुपीकरण थांबवा
सार्वजनिक ठिकाणी पोस्टर, बॅनर लावून शहर विद्रूप करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईची करण्यात यावी. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याच्या खालच्या बाजूला जाहीरातींचे पोस्टर चिटकवून विद्रूप केले जात आहे. मनपाच्या अतिक्रमण विभागाने दोषींवर कठोर कारवाई करावी व पुतळ्यांचे विद्रुपीकरण थांबवावे.

You May Also Like