दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार: वर्षा गायकवाड

मुंबई : सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय. वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्र्यांशी येत्या दोन दिवसात चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मुंबई उच्च न्यायालयानं उपस्थित केलेलं प्रश्न तसंच केंद्र सरकारची परीक्षांसंदर्भात असलेली भूमिका यावर मुख्यमंत्र्यांशी येत्या दोन दिवसात चर्चा करणार आहे. या चर्चेत परीक्षांच्या मुद्द्यांवर सविस्तर विश्लेषण होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी भेटीसाठी वेळ दिली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. विद्यार्थ्यांचे आरोग्य सरकारची प्राथमिकता असू पालकांमध्ये परीक्षा घेण्यावरुन भीती असं म्हणत काही तांत्रिक बाबी लक्षात घेता संपूर्ण विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसल्याचंही वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय.

सध्याची परिस्थिती वेगळी
दहावीच्या परीक्षांबाबत राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयावरुन मुंबई उच्च न्यायालयानं ताशेरे ओढले होते. त्यावरही शिक्षणमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली आहे. राज्यात सध्याची परिस्थिती खूप वेगळी आहे. करोनाची स्थिती गंभीर आहे आणि अशा परिस्थितीत परीक्षा घेणं कठीण आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटेत मुलांवर याचा परिणाम व्हायला लागला आहे. त्यामुळे सरकारची बाजू न्यायालयासमोर मांडू. न्यायालय यासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करेल, अशी मला खात्री असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

You May Also Like