राज्यात चित्रीकरणाला सशर्त परवानगी मिळणार? ; मुख्यमंत्री अन् राज ठाकरे यांच्यात चर्चा

मुंबई : महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट आली आणि मार्च महिन्याच्या शेवटी पुन्हा राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. गेल्या वर्षी करोनामुळे लॉकडाऊन झाल्याने मनोरंजन उद्योगाचे आर्थिक गणित कोलमडले. पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली. यामुळे एकूणच या विश्वावर अवकळा पसरली आहे. याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोरंजनसृष्टीतील काही प्रतिनिधींशी संवाद साधत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी राज्यात चित्रीकरण सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अनुकूलता दर्शवली आहे. मात्र त्यासाठी काही काटेकोर नियम आणि अटी, शर्ती निर्मात्यांना आणि वाहिन्यांनी पाळणे बंधनकारक केले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दीड महिन्यांपासून महाराष्ट्रातील सर्व चित्रीकरणे बंद आहेत. त्यामुळे निर्माते, वाहिन्यांनी दुस-या राज्यांत जाऊन चित्रीकरणाला सुरुवात केली. परंतु त्यामध्ये अनेक अडीअडचणी येत असल्याने राज्यात चित्रीकरणाला परवानगी मिळण्यासाठी मनोरंजन क्षेत्रातील काहीजण प्रयत्न करत होते. या प्रयत्नांचा भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मनोरंजनसृष्टीतल्या मान्यवरांनी बुधवारी झूमवरून चर्चा केली. यावेळी राज्यातील मनोरंजन सृष्टीचे होणारे नुकसान, त्यावर अवलंबून असणार्‍या कलाकारांचे, तंत्रज्ञांचे होणारे हाल, त्यांची परिस्थिती विषद करून सांगण्यात आली होती. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मनसे अध्यक्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली.

You May Also Like