दरडग्रस्तांचे पुनर्वसन करणार: मुख्यमंत्र्यांनी तळीये ग्रामस्थांना दिले आश्वासन

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दरडग्रस्त तळिये गावातील गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. म्हणाले की, गावातील लोकांनी काही काळजी करण्याचे कारण नाही. मृतांच्या नातेवाईकांना योग्य नुकसान भरपाई दिली जाणार असून गावातील दरडग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी अडीचच्या सुमारास तळीये गावात दाखल झाले होते. मुख्यमंत्री मुंबईवरुन हेलिकॉप्टरने महाडपर्यंत आणि तिथून रस्तेमार्गे तळीये गावात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्य सचिव सीताराम कुंटे, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, मंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनील तटकरे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. दरम्यान, या सर्वांनी दरडग्रस्त तळीये गावाची पाहणी केली आहे.

 

काळजी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
दुर्घटनेतील प्रत्येक कुटुबांना योग्य नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्यामुळे काळजी करण्याचे कोणतेच कारण नाही. तुम्ही फक्त स्वत:ची काळजी घ्या इतर सर्व आमच्यावर सोडा असे मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना धीर देताना सांगितले. कागदपत्राची कोणतीच काळजी करु नका सर्वाना योग्य ती मदत दिली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

You May Also Like