दहावीच्या विद्यार्थ्यांचे होणार मूल्याकंन; अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सीईटी

मुंबई : राज्यातील करोना संसर्गामुळे मागील वर्षभरापासून आपल्या सर्वांसमोर अनेक आव्हानं निर्माण झालेली आहेत. शिक्षण क्षेत्रातही खूप मोठ्याप्रमाणावर आव्हानं आलेली आहेत. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये आपण वर्षभर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन, ऑफलाइन अध्यापन यासाठी आपण वर्षभर विविध उपक्रम राबवले आहेत. करोना प्रादुर्भावामुळे मार्च-2021 पासून इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट असलेले विद्यार्थी, पालक व परीक्षेसंदर्भात काम करणारे घटक या सर्वांचे आरोग्य ही आमची सगळ्यात महत्वाची प्राथमिका आहे, हे आम्ही सातत्याने सांगत आलेलो आहोत. म्हणूनच राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित केलेली इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील निर्णय आम्ही, राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यानुसार राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता दहावी वर्षासाठी प्रविष्ट असणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे, सरकट उत्तीर्ण करण्यास संदर्भातील परवानगी दिली होती.

करोनामुळे उद्भवलेल्या असमान्य परिस्थितीत सर्वसमावेशक असे धोरण तयार करताना मी सांगू इच्छिते की, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्यासोबत सुमारे 24 विविध बैठकांद्वारे चर्चा करण्यात आली. या सर्वांशी सखोल चर्चा करून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे धोरण आम्ही निश्चित केले आहे. सदर मूल्यमापन धोरणानुसार, विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मुल्यमापन करण्यात येईल.

यामध्ये, इयत्ता नववी व इयत्ता दहावीसाठी सुधारित मूल्यामापन योजोना शासन निर्णय दि.8 ऑगस्ट 2020 नुसार मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इयत्ता दहावी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांच्या आधारे निश्चित करण्यात येईल.
1. विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण
2.विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीचे गृहपाठ/ तोडीं परीक्षा/ प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण
3.विद्यार्थ्यांचा इयत्ता नववीचा विषय निहाय अंतिम निकाल 50 गुण या प्रमाणे विषयनिहाय एकूण 100 गुण (इयत्ता नववी संपादणूक यासाठी 50 टक्के भारांश व इयत्ता दहावी संपादणूनक यासाठी 50 टक्के भारांश )

विद्यार्थ्यांना सीईटीतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य –
इयत्ता अकरावी प्रवेश परीक्षा राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा ज्या विद्यार्थांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल.

You May Also Like