यास ! ओडिशात मुसळधार पावसाला सुरुवात; 2 दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे

मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचं यास चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. वादळ ताशी 4 किलोमीटरच्या गतीनं ओडिशाच्या किनारपट्टीकडे वाटचाल करत आहे. सध्या हे वादळ ओडिशातील पारदीप बंदरापासून 520 किमी अंतरावर आहे. तर पश्चिम बंगालमधील दिघा बंदरापासून हे वादळ 610 किलोमीटर अंतरावर आहे. हे वादळ आता वेगानं ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीकडे मार्गक्रमण करत आहे. तर पुढील दोन दिवस हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असणार आहेत.

यास हे तौत्के चक्रीवादळाच्या तुलनेत अधिक प्रमाणात घातक आहे. या वादळाची स्वतः भोवती फिरण्याची गती सध्या ताशी 70 ते 80 किलोमीटर एवढी आहे. दिवसभरात ही गती ताशी 110 ते 120 किलोमीटरपर्यंत वाढू शकते, असा अंदाज हवामान विभागाकडुन वर्तविण्यात आली आहे. यास चक्रीवादळामुळे सध्या ओडिशातील किनारपट्टीच्या बहुतांशी भागात पावसाला सुरुवात झालीयं. ओडिशातील चंद्रभागा, कोणार्क याठिकाणी पावसाची स्थिती आणखीच भयंकर बनत चालली आहे.

त्यामुळे किनारपट्टी परिसरात राहणार्‍या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 26 तारखेच्या पहाटेपर्यंत मयासफ चक्रीवादळ उत्तर ओडीशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला तडाखा देणार आहे. त्यावेळी या वार्‍याची गती 160 किलोमीटर पर्यंत वाढलेली असेल असा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मागील तीन दिवसांपूर्वी अंदमान निकोबार परिसरात मान्सूननं आगमान केलं आहे. पुढील आठवड्यात कोकणातही मान्सूनचं आगमन होणार आहे. असं असलं तरी, पुढील दोन दिवस महाराष्ट्रासाठी पावसाचे असणार आहेत. आज आणि उद्या पुण्यासह, नाशिक, अहमदनगर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

You May Also Like