लखनौ । उत्तर भारतातील विविध राज्यांमधील मजूर मोठ्या प्रमाणात कामानिमित्त मुंबईत वास्तव्य करतात. यामध्ये उत्तर प्रदेशातील कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र करोना काळात उद्योग धंदे बंद झाल्याने या मजुरांना आपल्या मूळ गावी परतावं लागलं होतं. यावेळी वाहतुकीची साधनेही बंद असल्याने मजुरांचे प्रचंड हाल झाले होते. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला असून मुंबईत यूपी सरकारचं कार्यालय उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
मुंबईत कार्यालय सुरू करण्यामागे कोणता उद्देश आहे, याबाबत उत्तर प्रदेश सरकारने माहिती दिली आहे. ‘करोना काळात लाखो मजुरांना महाराष्ट्रासह इतर राज्यातून उत्तर प्रदेशात परत यावं लागलं होतं. या पार्श्वभूमीवर सरकारने विचारने विचार केला की, उत्तर प्रदेशातून कामानिमित्त बाहेर गेलेल्या लोकांच्या मदतीसाठी विविध राज्यांमध्ये आपलं कार्यालय असायला हवं. जेणेकरून त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेता येईल. तसंच संकटाच्या काळात लोकांना सुरक्षितपणे उत्तर प्रदेशात नेणं शक्य होईल आणि त्यांच्या कौशल्यनुसार येथेच त्यांना रोजगार उपलब्ध करून देता येईल,’ असं उत्तर प्रदेश सरकारच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे.
‘मुंबईत विविध उद्योग-धंद्यांच्या उभारणीपासून ते चित्रपट क्षेत्रातही उत्तर प्रदेशातून आलेल्या लोकांचं मोठं योगदान आहे,’ असंही यूपी सरकारने कार्यालयाची घोषणा करताना म्हटलं आहे.
दरम्यान, एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदाराने विरोध केलेला असतानाच उत्तर प्रदेश सरकारने मुंबईत कार्यालय सुरू केल्याची घोषणा केल्याने हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.