युवा फलंदाज शेफाली वर्माचे कसोटी पदार्पण शानदार ठरले

ब्रिस्टल : ‘युवा फलंदाज शेफाली वर्माचे कसोटी पदार्पण शानदार ठरले. तिने दोन्ही डावांत अर्धशतक झळकावत सर्वांनाच प्रभावित केले. शेफाली भारतासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील महत्त्वाची खेळाडू आहे,’ असे भारतीय कसोटी महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने सांगितले.

१७ वर्षीय शेफालीने इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात पहिल्या डावात ९६ धावांची आक्रमक खेळी केली. यानंतर दुसऱ्या डावात तिने ६३ धावा केल्या. कसोटी पदार्पणात दोन्ही डावांत अर्धशतक झळकावणारी शेफाली सर्वांत युवा, तसेच एकूण चौथी फलंदाज ठरली. या जोरावरच तिची सामनावीर पुरस्कारसाठी निवड झाली. मितालीने म्हटले की, ‘क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत शेफाली भारताची महत्त्वपूर्ण फलंदाज आहे. तिने खूप चांगल्या प्रकारे कसोटी क्रिकेटशी जुळवून घेतले. तिने टी-२० प्रमाणे पहिल्याच चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला नाही.

नव्या चेंडूने ती जबाबदारीने खेळली आणि संघात तिचे असणे शानदार आहे.’ शेफालीच्या निवडीबाबत मिताली म्हणाली की, ‘तिच्याकडे फटक्यांची विविधता आहे आणि जर का ती लयमध्ये आली तर कसोटी क्रिकेटमध्येही ती खूप प्रभावी कामगिरी करेल. लय मिळाल्यास ती वेगाने धावा फटकावते. जेव्हा आम्हाला वापर झालेल्या खेळपट्टीवर खेळायचे असल्याचे कळाले, तेव्हाच आम्ही शेफालीला पदार्पणाची संधी देणे योग्य ठरेल, असे ठरवले. तिने आमचा विश्वास सार्थ ठरविला.’

महिला क्रिकेटसाठी हा सामना चांगला ठरला : नाइट

इंग्लंडची कर्णधार हिथर नाइट हिने म्हटले की, ‘भारताविरुद्धचा झालेला एकमेव कसोटी सामना महिला क्रिकेटकडे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेला शानदार प्रयत्न होता, पण त्याचवेळी महिला कसोटी सामना चारऐवजी पाच दिवसांचा खेळविण्यात यावा.’

You May Also Like