तुमचे प्रयत्न अपुरे; असुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले

नवी दिल्ली :  करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. नव्या बाधितांची संख्या घटत असली, तरी मृत्यूचे वाढते प्रमाण चिंतेत भर घालत आहे. सर्वोच्च न्यायालयासह देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये करोनासंदर्भात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. स्थलांतरीत मजुरांच्या मुद्यावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तुम्ही करत असलेले प्रयत्न अपुरे असून, आम्ही याबाबत समाधानी नाही, असे न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले.

स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले असून, कामगार नोंदणी योजनेविषयी उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. मजूर, कामगारांची नोंदणी प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली. तसेच ही प्रक्रिया गतिमान करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मजुरांची नोंदणी प्रक्रिया संथगतीने सुरू असुन ती गतिमान होणे आवश्यक आहे. जेणेकरून स्थलांतरीत मजूर, कामगारांना सरकारी योजनांचा योग्य पद्धतीने आणि प्रमाणात लाभ मिळवता येऊ शकेल. मात्र, नोंदणी झाल्याशिवाय योजनांचा लाभ मिळू शकणार नाही. स्थलांतरीत मजूर, कामगारांना सरकारी योजनांचा लाभ कशा प्रकारे मिळेल, याबाबत केंद्र सरकारने निश्चित धोरण राबवले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

कामगिरीवर समाधानी नाही
असंघटित क्षेत्रातील मजूर, कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेवरून केंद्र तसेच राज्यांचे सुरू असलेले प्रयत्न पुरेसे नाहीत. तुमच्या या कामगिरीवर आम्ही समाधानी नाही, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले आहे.

You May Also Like